जवळपास दोन महिन्यांच्या अवधीनंतर शुक्रवारी एखाद्या देशात फुटबॉल सामना खेळला गेला. तब्बल ४२,४७७ प्रेक्षकक्षमता असलेल्या जीऑन्जू स्टेडियमच्या हिरवळीवर कोरिया लीगच्या सामन्यांना प्रारंभ झाला. परंतु करोना विषाणू संसर्गाच्या सावटामुळे या सामन्यासाठी एकाही प्रेक्षकाला प्रवेश देण्यात आला नाही.

एकीकडे युरोपमधील नामांकित फुटबॉल स्पर्धा बंद असताना दक्षिण कोरियाने मात्र दोन दिवसांपूर्वीच स्थानिक लीग सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. खेळाडूंना या सामन्यादरम्यान हस्तांदोलन अथवा गोल केल्यानंतर जल्लोष करण्यासही मनाई करण्यात आली होती. ‘कोपा ९० फुटबॉल लाइव्ह’ या ‘यूटय़ूब’ वाहिनीवरून या लढतीचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. गतविजेते जोनबर्क मोटर्स विरुद्ध सुवान ब्लेविंग्स यांच्यात खेळवण्यात आलेला हा सामना जोनबर्क संघाने १-० असा जिंकला.

चायनीज सुपर लीग विदेशी खेळाडूंविना?

शांघाय : चायनीज सुपर लीगला पुढील महिन्यापासून सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती चीन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चेन शुआन यांनी शुक्रवारी दिली. परंतु या लीगमधील विदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. २२ फेब्रुवारीपासून रंगणारी ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. परंतु आता चीनमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने जूनच्या पहिल्या आठवडय़ात या स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ला लिगाच्या लढती २० जूनपासून?

माद्रिद : ला लिगा फुटबॉलच्या सामन्यांना २० जूनपासून सुरुवात होऊन पुढील पाच आठवडय़ांत ही स्पर्धा संपवली जाऊ शकते, असे मत लिगनेस संघाचे प्रशिक्षक झेव्हियर अ‍ॅग्वायर यांनी व्यक्त केले. ‘‘ला लिगाच्या सामन्यांना २० जूनपासून सुरुवात करण्याविषयी सर्व संघांना कळवण्यात आले असून, २६ जुलैपर्यंत ही लीग संपवण्यात येईल. बुधवार-गुरुवार आणि शनिवार-रविवार असे आठवडय़ातून चार दिवस हे सामने खेळवले जातील,’’ असे अ‍ॅग्वायर म्हणाले. परंतु या निर्णयावर सर्व संघांतील खेळाडू तसेच प्रशिक्षकांनी संमती दर्शवणे अद्याप शिल्लक आहे.