इन्चॉन : भारताच्या पारुपल्ली कश्यपने गुरुवारी कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात मलेशियाच्या डॅरेन लीवचा पराभव केला.
हैदराबादच्या ३३ वर्षीय कश्यपने ५६ मिनिटांच्या सामन्यात डॅरेनला २१-१७, ११-२१, २१-१२ असे नामोहरम केले. उपांत्यपूर्व सामन्यात त्याची डेन्मार्कच्या यान ओ जर्गेनसनशी गाठ पडणार आहे. २०१४मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या कश्यपचे एकमेव आव्हान आता या स्पर्धेत उरले आहे. २०१५च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या जर्गेनसनविरुद्ध कश्यपची कामगिरी २-४ अशी राहिली आहे.
बुधवारी विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. सिंधूने अमेरिकेच्या बेवेन झँगविरुद्धच्या सामन्यात ७-२१, २४-२२, १५-२१ असा पराभव केला. दक्षिण कोरियाच्या किम गा ईऊनविरुद्धच्या सामन्यात लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना २१-१९, १८-२१, १-८ अशी पिछाडीवर असताना आजारपणामुळे तिला सामना सोडावा लागला. बी. साईप्रणीतलाही दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 2:29 am