कोरिया सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजयी धडाका कायम ठेवला आहे. ऑलिम्पिक आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मिनात्सू मितानीला २१-१९, १८-२१, २१-१० अशा गुणफरकाने पराभूत केले. या विजयासह सिंधूने स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक दिली आहे.

पी. व्ही. सिंधूचा उपांत्यफेरीत सूंग जी ह्यून आणि ही बिंगजिआओ यांच्यातील विजेत्या खेळाडूशी सामना होणार आहे. सिंधूने सेमिफायनलमध्ये विजय मिळवला आणि दुसरीकडे नोझामी ओकुहारा हिने सेमिफायनलमध्ये आकानी यामागुचीवर मात केली तर पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तीनच आठवड्यांपूर्वी जागतिक स्पर्धेत या दोघी आमनेसामने आल्या होत्या. अटातटीच्या या लढतीत ओकुहाराने सिंधूवर मात केली होती. सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा पराभव करून तिने सुवर्णपदक जिंकले होते. तर सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.