News Flash

आठवी नवनायिका!

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पटलावर शनिवारी बाबरेरा क्रेजिकोव्हाच्या रूपात आठव्या नवनायिकेचा उदय झाला.

आठवी नवनायिका!

क्रेजिकोव्हाची कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर

वृत्तसंस्था, पॅरिस

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पटलावर शनिवारी बाबरेरा क्रेजिकोव्हाच्या रूपात आठव्या नवनायिकेचा उदय झाला. चेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित क्रेजिकोव्हाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाला हरवून कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली.

फिलिपे चॅट्रियर कोर्टवर एक तास, ५८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अंतिम लढतीत क्रेजिकोव्हाने पाव्हल्यूचेन्कोवावर ६-१, २-६, ६-४ असा विजय मिळवला. जेतेपद मिळवल्यानंतर २५ वर्षीय क्रेजिकोव्हाला अश्रू अनावर झाले.  सलग आठव्या वर्षी एखाद्या नव्या खेळाडूने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्याशिवाय गेल्या पाच वर्षांत ही स्पर्धा जिंकणारी क्रेजिकोव्हा ही तिसरी बिगरमानांकित खेळाडू ठरली. तिचे हे कारकीर्दीतील अवघे दुसरे विजेतेपद आहे.

पहिल्या सेटमध्ये क्रेजिकोव्हाने परतीच्या फटक्यांचा सुरेख वापर करताना वर्चस्व गाजवले. सामन्याच्या पहिल्या गेममध्ये ब्रेक पॉइंट गमावल्यावर तिने पाव्हल्यूचेन्कोवाला पुन्हा डोके वर काढण्याची संधी न देता सलग सहा गेम जिंकले. दुसऱ्या सेटमध्ये पाव्हल्यूचेन्कोवाने दोन ब्रेक पॉइंट मिळवून क्रेजिकोव्हावर दडपण आणले. तिने १-१ अशी बरोबरी साधून सामना तिसऱ्या सेटपर्यंत लांबवला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र नव्या दमाच्या क्रेजिकोव्हाने झोकात पुनरागमन केले आणि ६-४ अशा फरकाने तिसऱ्या सेटसह जेतेपदावरही शिक्कामोर्तब केले.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

मला पाठिंबा देण्यासाठी येथे आलेल्या सर्वाचे मी आभार मानते. मी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे, यावर अद्यापही विश्वास बसत नाही. मार्टिना नवरातिलोव्हा, प्रशिक्षक आणि चाहत्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्य झाले नसते. माझ्या मार्गदर्शक याना नोव्होत्ना आज हा क्षण पाहण्यासाठी आपल्यासोबत असत्या, तर अधिक आनंद झाला असता!               – बाबरेरा क्रेजिकोव्हा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 12:53 am

Web Title: krajikovas first grand slam title of her career french open ssh 93
Next Stories
1 जोकोव्हिचकडून नदाल चीत
2 दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
3 वेल्सची स्वित्झर्लंडशी बरोबरी
Just Now!
X