18 November 2017

News Flash

आयना का बायना, जिंकल्याशिवाय..

* आजपासून दुसरा कसोटी सामना * विजयाचा ध्वज उंचावण्यासाठी भारत सज्ज * मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंड

प्रसाद लाड, मुंबई | Updated: November 23, 2012 4:48 AM

* आजपासून दुसरा कसोटी सामना
* विजयाचा ध्वज उंचावण्यासाठी भारत सज्ज
* मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंड उत्सुक
खेळपट्टी पाटा असेल की ‘स्पोर्टिग’.. फिरकीला मदत करणारी की वेगवान माऱ्याला साथ देणारी.. पहिल्या दिवसापासून चेंडू वळेल की तिसऱ्या दिवसापासून.. इंग्लंड पुन्हा फिरकीच्या जाळ्यात अडकणार की भारताचे कागदी वाघ ढेपाळणार.. या आणि अशा अन्य बऱ्याच प्रश्नांना तोंड फोडत आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे तो यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना. पहिला सामना ९ विकेट्स राखून सहज जिंकल्यावर विजयाचा हा ध्वज उंचावण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल, तर दुसरीकडे भारतीय दौऱ्यातील पहिलावहिला विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ आसुसलेला असेल. यावेळी साऱ्यांचीच नजर असेल ती १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागवर. त्याचबरोबर क्रिकेटजगताचा लाडका मुंबईकर सचिन तेंडुलकर घरच्या प्रेक्षकांना शतकाची भेट देऊन सध्याच्या वाईट फॉर्मचे चक्रव्यूह भेदतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
चेतेश्वर पुजाराने पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद द्विशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तो या सामन्यात संघाच्या धावसंख्येत किती धावांची भर टाकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सेहवाग चांगल्या फॉर्मात असला तरी त्याने संयम बाळगला तर शंभराव्या कसोटी सामन्यात शतक झळकावून तो एक अनोखा विक्रम रचू शकतो. सलामीवीर गौतम गंभीरला हवा तसा सूर गवसलेला नाही. सचिनकडून घरच्या खेळपट्टीवर नक्कीच तीन अंकी धावसंख्येची अपेक्षा असेल. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. पहिल्या कसोटी सामन्यात शतक हुकलेल्या युवराज सिंगने या सामन्यासाठी कसून सराव केला असून तो शतक झळकावतो का, यावर साऱ्यांची नजर असेल. गोलंदाजीमध्ये दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह भारतीय संघ उतरणार आहे. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा ही जोडी कायम राहणार असून हरभजनला संधी देण्यात येणार नाही, हे धोनीने स्पष्ट केले आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवला पाठीची दुखापत झाल्याने तो या सामन्याला मुकण्याची शक्यता असून त्याच्याजागी इशांत शर्माला संधी देण्यात येऊ शकते.
पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि मॅट प्रायर यांची दमदार फलंदाजी आणि ग्रॅमी स्वानची फिरकी हेच संचित इंग्लंडच्या संघाकडे असेल. गेल्या २७ वर्षांमध्ये इंग्लंडला भारतात एकही मालिका जिंकता आली नसल्याने या सामन्यात बरोबरी करण्यासाठी ते आतुर असतील. कुक आणि निक कॉम्प्टन ही सलामीची जोडी संघाला सुरुवात कशी करून देते, हे उत्सुकतेचे ठरेल. केव्हिन पीटरसन हा इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मानला जात असला तरी आतापर्यंत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इयान बेल आणि जोनाथन ट्रॉट यांनाही अजून आपली छाप पाडता आलेली नाही. कुकबरोबरच प्रायरकडून या सामन्यात नक्कीच मोठय़ा अपेक्षा असतील. गोलंदाजीमध्ये ग्रॅमी स्वान चांगल्या फॉर्मात असून त्याला साथ देण्यासाठी माँटी पनेसारला संघात स्थान देण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यात इंग्लंडला सामना जिंकण्याची सर्वाधिक संधी वानखेडेवर आहे, असे काही क्रिकेटपंडितांनी भाकीत केले आहे. त्यामुळे इंग्लंड हे भाकीत खरे ठरवते, की भारतीय संघ वानखेडेवर विजयी पताका फडकवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, युवराज सिंग, आर. अश्विन, उमेश यादव, झहीर खान, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, इशांत शर्मा, मुरली विजय आणि अशोक दिंडा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जेम्स अँडरसन, टीम ब्रेसनन, निक कॉम्प्टन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, मॅट प्रायर, ग्रॅमी स्वान, जोनाथन ट्रॉट, स्टुअर्ट ब्रॉड, जो रूट, जॉनी बेअरस्टो, ग्रॅहम ओनियन्स, इऑन मॉर्गन, माँटी पनेसार आणि स्टुअर्ट मीकर.
  सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून
  थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स.

First Published on November 23, 2012 4:48 am

Web Title: krida aai na ka bai na
टॅग Cricket,England,India