वीरेंद्र सेहवागची फलंदाजी म्हणजे मुक्तछंदातले काव्य. त्याला नियमांची बंधने नाही. ‘नजफगढचा नवाब’ उपाधीला साजेसा खेळ दाखविणाऱ्या सेहवागच्या शब्दकोशात बचावात्मक फटकाच नाही. आक्रमकता ही त्याच्या नसानसात भिनली आहे. ‘वीरू’ रसाने प्रेरित असलेल्या या अध्याला भारतीय क्रिकेटच्या व्यासपीठावर प्रारंभ झाला तो नोव्हेंबर २००१मध्ये. ठिकाण होते दक्षिण आफ्रिकेमधील ब्लोईमफोन्टीनचे गुडईयर पार्क मैदान. नाणेफेक जिंकल्यावर दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण शिवसुंदर दास, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांनी घाईने तंबूची वाट पकडल्यामुळे भारताची ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. सुदैवाने सचिन तेंडुलकर मैदानावर होता. पदार्पणाच्या त्या कसोटी सामन्यात सेहवाग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. समोर आपला लाडका गुरूसमान क्रिकेटपटू सचिन असल्यामुळे सेहवाग तसा निर्धास्त होता. त्यानंतर सचिन-सेहवाग जोडीने पाचव्या विकेटसाठी २२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या पहिल्या डावात शतके झळकावली. त्यामुळे भारताला ३७९ ही धावसंख्या उभारता आली होती. दुर्दैवाने ती कसोटी भारताने गमावली. परंतु पदार्पणातच शतक झळकावणारा सेहवाग मात्र सर्वाच्याच लक्षात राहिला. प्रारंभीच्या दिवसांत सेहवाग मधल्या फळीत फलंदाजी करायचा. मग २००२मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी सलामीच्या स्थानांसाठी भारताची युद्धपातळीवर शोधाशोध सुरू होती. त्यामुळे सेहवागलाही आजमावून पाहू, म्हणून लॉर्ड्सच्या कसोटीत वसिम जाफरसोबत सेहवाग सलामीला उतरला. दोन्ही डावांमध्ये त्याने अनुक्रमे ८४ आणि २७ धावा केल्या. त्यानंतर नॉटिंघहॅमच्या दुसऱ्या कसोटीत सेहवागने शानदार शतक झळकावले.
शुक्रवारी वानखेडेवर आपल्या कसोटी कारकीर्दीतील शंभरावी कसोटी खेळणाऱ्या सेहवागकडून क्रिकेटरसिक शतकाची अपेक्षा करीत आहेत. वानखेडे स्टेडियमवर ऑक्टोबर २००२मध्ये सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २४ चौकार आणि ३ षटकारांसह १४७ धावांची दमदार खेळी साकारली होती. ती कसोटी भारताने एक डाव आणि ११२ धावांनी जिंकली होती. सेहवागने वानखेडेवरील चार कसोटी सामन्यांत ३७.५७च्या सरासरीने २६३ धावा केल्या आहेत.
२००६मध्ये वानखेडे कसोटीनेच इंग्लंडचे नशीब पालटले!
‘‘कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधूनच आम्ही कोलकात्याला जाऊ,’’ असा इशारा बुधवारी इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉटने दिला होता. परंतु भारतीय संघाने तर मालिका ४-० अशा फरकाने जिंकून इंग्लंडकडून गतवर्षी पत्करलेल्या पराभवाची परतफेड करण्याचे मनसुबे आखले आहेत. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ देणारी खेळपट्टी हवी आहे. याचे कारणही तसेच आहे. अहमदाबादहून मुंबईत आल्यानंतर वानखेडेवरील सामन्याच्या बाबतीत भारतीय संघ थोडासा सावध आहे. याचे कारण म्हणजे मार्च २००६मध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत १-० अशी आघाडी घेऊन समाधानाने भारतीय संघ मुंबईत आला होता. पण वानखेडेवर मात्र इंग्लिश संघाने तिसरी कसोटी तब्बल २१२ धावांनी जिंकली आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफने अष्टपैलू कामगिरी करीत सामनावीर पुरस्काला गवसणी घातली होती. त्यामुळे आता इंग्लिश संघाला अनुकूल ठरणाऱ्या वानखेडेवर भारतीय संघाचा दुसरा कठीण पेपर असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर या दोन संघांमधील कामगिरीचा आढावा घेतल्यास ३ सामने भारताने २ सामने इंग्लंडने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.