थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हिने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर आपला हक्क सांगितला असला तरी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कारांच्या पहिल्या यादीत कोणताही बदल करण्याबाबत उत्सुकता दर्शवलेली नसल्याचे समजते.
खेलरत्न पुरस्कारासाठी नेमबाज रंजन सोधी याच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर पुनियाने आपण या किताबासाठी लायक असल्याचा दावा करीत क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली होती. तसेच पॅराऑलिम्पिक रौप्यपदक विजेता एच.एन.गिरीशा याने आपल्याला हा किताब किंवा अर्जुन पुरस्कार द्यावा अशी मागणी केली होती.
जितेंद्र सिंग यांनी या संदर्भात केंद्रीय क्रीडा सचिव पी.के.देव यांच्याबरोबर सोमवारी व मंगळवारी सविस्तर चर्चा केली. जितेंद्र सिंग यांनी खेलरत्न तसेच अर्जुन पुरस्काराच्या १५ खेळाडूंच्या यादीवर अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र पुरस्कारासंदर्भात शिफारस करण्यात आलेल्या यादीत बदल करण्यास ते तयार नसल्याचे क्रीडा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.