भारत अ विरुद्ध वेस्ट इंडिज अ यांच्यात सुरु असलेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात फिरकीपटू कृष्णप्पा गौथमने हॅटट्रीकची नोंद केली आहे. वेस्ट इंडिजच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना गुंडाळत कृष्णप्पाने भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. भारत अ संघाकडून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदवणारा कृष्णप्पा गौथम पहिला गोलंदाज ठरला आहे.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हनुमा विहारी आणि वृद्धीमान साहाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २०१ धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या विंडीज अ संघाची चांगली सुरुवात झाली होती. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचा सामना करणं जमलं नाही. भारताने दिलेली धावसंख्या पार करुन विंडीजचा संघ आघाडी घेणार असं वाटत असतानाच, कृष्णप्पा गौथमने तळातल्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं.

कृष्णप्पाच्या या कामगिरीमुळे भारत अ संघाला पहिल्या डावात ७ धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावातली भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताचे सलामीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले आहेत. त्यामुळे उरलेले फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.