अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला ऑस्ट्रेलिया संघ कृणाल पांड्याच्या माऱ्यासमोर कोलमडला. कृणालने 36 धावांत 4 बळी घेत कांगारुंना 164 धावांमध्ये रोखलं. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनेही कृणाल पांड्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – विराटच्या अर्धशतकाने मालिका बरोबरीत, अखेरच्या टी-20 सामन्यात भारत विजयी

दरम्यान आजच्या सामन्यादरम्यान कृणाल पांड्याने काही खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.

  • कृणाल पांड्याची 36 धावांत 4 बळी ही भारतीय गोलंदाजाची ऑस्ट्रेलियातली टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
  • पहिल्याच टी-20 सामन्यात कृणाल पांड्याला चांगलाच मार पडला होता. 4 षटकांमध्ये कृणालने 55 धावा देऊन एकही बळी घेतला नव्हता. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम आणि सर्वात खराब कामगिरीचा विक्रमही आता कृणालच्या नावे जमा आहे.
  • आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा कृणाल 13 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
  • याचसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात 4 बळी घेणारा कृणाल दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी 2014 च्या टी-20 विश्वचषकात रविचंद्रन आश्विनने ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.
  • ऑस्ट्रेलियात खेळताना टी-20 क्रिकेटमध्ये 4 बळी घेणारा कृणाल पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद