टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनी भारतीय संघात पदार्पण केलं आणि दोघांनीही पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली. गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाने ५४ धावा देत सर्वाधिक ४ बळी घेतले, तर कृणाल पांड्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. कृणालने अवघ्या २६ चेंडूंमध्ये चौकार-षटकारांची बरसात करत अर्धशतक ठोकले. पण या दमदार खेळीनंतर कृणालला अश्रू अनावर झाले.

विक्रमी अर्धशतक झळकावल्यावर कृणालला मैदानात रडू आवरेनासे झाले होते, त्याचा भाऊ हार्दिकही यावेळी भावुक झालेला पाहायला मिळाला. सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाची निळी कॅप स्वीकारतानाही कृणाल भावुक झाला होता. त्याने कॅप घेतली आणि वरती आकाशाच्या दिशेने ती कॅप हलवली, जणू काही आपल्या वडिलांना त्याने टीम इंडियाची कॅप दाखवून आदरांजली वाहिली. यावर्षी जानेवारी महिन्यातच कृणालच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तो पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. विक्रमी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आकाशाकडे बघत त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगले, त्यावेळी कृणालचा भाऊ हार्दिकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तो मैदानातच आपला लहान भाऊ हार्दिकला मिठी मारत रडू लागला. भारताची फलंदाजी संपल्यानंतरही कृणाल इतका भावुक झाला होता की, प्रतिक्रिया देण्यासाठी त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. कृणालने आपली खेळी दिवंगत वडिलांना समर्पित केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आणखी वाचा- पप्पाने तुला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं; हार्दिकची कृणाल पांड्यासाठी खास पोस्ट


दरम्यान, पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कृणालने 26 चेंडूंत अर्धशतक ठोकले आणि पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात अर्धशतक ठोकणारा कृणाल 15वा फलंदाज ठरला. पदार्पण करताना सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा मान आता कृणालच्या नावावर जमा झाला आहे. त्याने 31 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. या खेळीदरम्यान कृणालने लोकेश राहुलच्या (नाबाद 62) साथीने सहाव्या विकेटसाठी 61 चेंडूंत 112 धावांची भागीदारी केली. कृणालने न्यूझीलंडच्या जॉन मॉरिस यांचा विक्रम मोडला. 1990मध्ये मॉरिस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना 35 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.