करोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. स्पर्धा सुरु होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आहे. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार करत अखेरच्या क्षणी दीपक हुड्डानं स्पर्धेतून माघार घेतली आहे.

रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी बडोद्याच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना क्रुणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाल्याचं समोर आलं आहे. दीपक हुड्डानं याबाबत बीसीसीआयला ईमेलद्वारे खवलं आहे. यामध्ये क्रृणाल पांड्यानं त्याला शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. शिवाय आगामी टी-२० मुश्ताक अली स्पर्धेत खेळणार नसल्याचं कळवलं आहे. दीपक प्रशिक्षकाच्या परवानगीनेच सराव करीत असताना अष्टपैलू पांड्याने त्याला धमकावण्यास सुरूवात केली असल्याचेही दीपकने आपल्या ई-मेलमध्ये लिहिलं आहे. काही प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, दीपकबरोबर वाद सुरु असताना क्रृणालनं क्रिकेट करीअर संपवून टाकेल, अशी धमकी दिली आहे.

दीपक हुड्डानं ४६ प्रथम श्रेणी सामेन, ६८ लिस्ट ए सामने आणि १२३ टी-२० सामन्यात बडोद्याच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळला आहे.

दरम्यान, फेब्रुवारीत ‘आयपीएल’चा लिलाव होत असल्याने देशातील बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे सर्वाचे विशेष लक्ष असेल. त्याचबरोबर वर्षअखेरीस भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची दुसरी फळी तयार ठेवण्याची जबाबदारी नव्या राष्ट्रीय निवड समितीसमोर असेल. ऋतुराज गायकवाड, प्रियम गर्ग, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सर्फराझ खान, आर. साईकिशोर आणि एम. सिद्धार्थ या नव्या चेहऱ्यांकडेही निवड समितीचे लक्ष असेल. जैवसुरक्षा वातावरणात सहा वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.