करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी सर्व स्तरातील लोकं पुढे येत आहेत. अनेक सामान्य नागरिकांनीही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत केली आहे. आजी-माजी खेळाडू, व्यवसायिकही सध्याच्या काळात भरघोस मदत करत आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान आणि युसूफ पठाण यांनी सध्याच्या खडतर काळात, आपलं सामाजिक भान राखतं गरजू व्यक्तींच्या अन्नधान्याची सोय केली आहे. १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे पठाण बंधूंनी दान केले आहेत.
“सध्याच्या काळात सरकारला ज्या पद्धतीच्या मदतीची गरज आहे ती मदत करायला आम्ही तयार आहोत. पुढचे काही दिवस खडतर असणार आहेत, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांना आम्ही घरातच थांबण्याची विनंती करतो. या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकच गरजेचं आहे.” पठाण बंधूंनी Crictracker संकेतस्थळाशी बोलताना माहिती दिली. पठाण बंधूंव्यतिरीक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.
याआधीही पठाण बंधूंनी आपल्या सामाजिक संस्थेद्वारे परिसरातील गरजू व्यक्तींना मोफत मास्कचं वाटप केलं होतं. इरफान आणि युसूफ हे भाऊ आपल्या वडिलांच्या नावाने सामाजिक संस्था चालवतात. दरम्यान देशभरात सर्व महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा यावर कधी नियंत्रण मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 2:04 pm