ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याच्या या कामगिरीमुळे प्रशिक्षक रवी शास्त्री भलतेच खूश झालेले असून, आगामी २०१९ विश्वचषकासाठी कुलदीप यादव आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू ठरु शकतो असं वक्तव्य शास्त्री यांनी केलेलं आहे. ते India TV वाहिनीशी बोलत होते.

“कदाचित विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये कुलदीपला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळू शकेल. मनगटातून चेंडू वळवणारे गोलंदाज हे कोणत्याही संघासाठी जमेची बाजू असल्यामुळे आम्हाला इतर फिरकीपटूंच्या निवडीबद्दल निर्णय घ्यावा लागेल.” रवी शास्त्री यांनी कुलदीप यादवच्या खेळाचं कौतुक केलं.

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ च्या फरकाने बाजी मारुन ऑस्ट्रेलियन भूमीत इतिहास घडवला. फलंदाजीत चेतेश्वर पुजाराने ३ शतकं झळकावत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. ऋषभ पंतनेही फलंदाजी आणि यष्टीरक्षणात कमाल करुन दाखवली. यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.