कुलदीप यादव हा शेन वॉर्नप्रमाणे हवेच्या झोतातच चेंडू वळवतो. त्याचे हे कौशल्य अधिक प्रभावी असल्यामुळे फलंदाजांसाठी यजुवेंद्र चहलपेक्षा कुलदीप हा खेळायला अधिक अवघड भासतो, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने कुलदीपची प्रशंसा केली.

बोटाने चेंडू वळवणाऱ्या गोलंदाजांपेक्षा हे दोघे मनगटी फिरकीपटू अधिक धैर्य दाखवत असल्याबाबतही हेडनने त्यांचे कौतुक केले. निर्धारित षटकांच्या क्रिकेट प्रकारांमध्ये या दोघांनी जगातील अव्वल फलंदाजांना संकटात टाकले आहे.

कुलदीप हा चेंडू किती वळवतो, हे बघू नका. ते त्याचे बलस्थानच नाही. मात्र तो ज्याप्रमाणे हवेतच चेंडूला फिरवतो आणि वॉर्नप्रमाणे त्याचा चेंडू ज्या प्रकारे फलंदाजापर्यंत पोहोचतो, ते त्याचे वैशिष्टय़ आहे. त्या तुलनेत चहलला आत्मविश्वासाने खेळता येऊ शकते असे वाटत असल्याचे हेडनने नमूद केले.

चहल हा यष्टींवरच अधिक मारा करण्यावर भर देतो. त्यामुळे त्याचे चेंडू हवेत करामत करू शकत नाहीत. त्यामुळे मी जर फलंदाज असतो, तर कुलदीपपेक्षा चहलचा सामना करणे मला अधिक आवडले असते. हेडनने त्याच्या कारकीर्दीत अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यासारख्या भारताच्या अव्वल फिरकीपटूंचा प्रभावीपणे सामना केला असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व आहे.