सिडनी येथे सुरू असेलेल्या चौथ्या कसोटीत भारताकडे सध्या ३१२ धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात गुंडाळण्यात भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने महत्वाची भूमिका बजावली आहे. पहिल्या डावात कुलदीपने ९९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले आहेत. याबरोबर आशिया खंडाबाहेर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

गतवर्षी इंग्लंडबरोबर ट्रेंट ब्रीजवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २५ धावांच्या मोबदल्यात सहा बळी घेतले होते. तर ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात २४ धावा देत ५ बळी घेतले होते. आतापर्यंत भारताच्या एकाही गोलंदाजाला आशिया खंडाबाहेर तिनही प्रकारात पाच बळी घेता आलेले नाहीत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात ५ बळी घेणारा कुलदीप जगातील दुसराच डाव्या हाताचा फिरकीपटू(चायनामन गोलंदाज) ठरला आहे. याआधी इंग्लंडचे फिरकीपटू जॉनी वॉर्डल यांनी १९५५ला सिडनीमध्येच ७९ धावा देत पाच विकेट्स पटकावल्या होत्या.