ईडन गार्डन्सच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलिन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. यष्टिरक्षक मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला माघारी धाडत कुलदीप यादवनं २६ वर्षांपूर्वीच्या कपिल देव यांच्या आठवणीला उजाळा दिला. भारताकडून वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेणारा कुलदीप तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी भारताकडून चेतन शर्मा आणि कपिल देव यांनी वन-डे सामन्यात हॅटट्रिक घेतली होती.

४ जानेवारी १९९१ मध्ये ईडन गार्डन्सच्या मैदानावर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी हॅटट्रिक घेतली होती. त्यांनी श्रीलंकेच्या रोशन महानमा, रुमेश रत्नायिके आणि सनथ जयसूर्या यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. कपिल देव यांच्यापूर्वी चेतन शर्मा यांनी विदर्भ असोसिएशनच्या म्हणजेच नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात असा पराक्रम केला होता.  कुलदीपने पहिल्या वन-डे सामन्यातही लक्षवेधी खेळी केली होती. या सामन्यात त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोयनिस यांना तंबूचा रस्ता दाखवत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.