आशिया खंडाबाहेर चार विकेट पाच वेळा घेणाऱ्या कुलदीपने माजी कर्णधार व दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाशी केली आहे. कुलदीप यादवने कुंबळेपेक्षा कमी सामन्यात हा पराक्रम केला आहे. कुलदीपने फक्त १८ सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर कुंबळेला यासाठी तब्बल ९४ सामने खेळावे लागले. आशिया खंडाबाहेर चार विकेट घेण्याचा मान कुलदीपने पाचव्यांदा पटकावला. या कामगिरीसह त्याने कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली.

न्यूझीलंडमध्ये सलग दोन सामन्यात चार विकेट घेण्याचा पराक्रमही कुलदीपने केला आहे. पहिल्या सामन्यात ३९ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले होते. आज झालेल्या सामन्यातही कुलदीपने चार बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा कुलदीप पहिलाच गोलंदाज झाला आहे. न्यूझीलंडमध्ये सलग दोन सामन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम याआधी कोणत्याही भारतीय फिरकी गोलंदाजाला करता आला नाही.

वन डे सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेण्याचा विक्रम कुंबळेच्या नावावर आहे. त्याने २६९ सामन्यांत १०वेळा चार विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा ८ ( १४७ सामने), सचिन तेंडुलकर ६ ( ४६३), हरभजन सिंग ५ (२३४) आणि कुलदीप यादव ५ (३७) यांचा क्रमांक येतो.

कुलदीप यादवची भेदक गोलंदाजी आणि रोहित-धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह विराटसेनेने भारतीयांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिली आहे. भारताने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना ४०.२ षटकांत न्यूझीलंडचा संघ २३४ धावांवर गारद झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात सात बळी घेतले. कुलदीप यादवने चार बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. चहलने दोन आणि केदार जाधवने एक बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. याशिवाय भुवनेश्वरने दोन आणि शामीने एका फलंदाजाला बाद केले.