फिरकीपटू कुलदीप यादवने फार कमी कालावधीत भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडगोळी ही भारतीय संघाची सध्या पहिल्या पसंतीची जोडी आहे. कुलदीपने वन-डे, टी-२० क्रिकेटसोबत कसोटी क्रिकेटमध्येही आपलं योगदान दिलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्यात धर्मशाळा कसोटी सामन्यात कुलदीपने भारतीय संघाकडून पदार्पण केलं. या सामन्याआधी तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कुलदीपसमोर एक अट ठेवली होती.

“धर्मशाळा कसोटी सामना माझ्यााठी अत्यंत खास आहे. मी जेव्हा कधीही या सामन्याविषयी बोलतो त्यावेळी मला भावूक व्हायला होतं. माझी कामगिरी कशी होईल याची मला चिंता होती. त्यावेळी अनिल सर माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुला या सामन्यात ५ विकेट मिळवाव्या लागतील. हे ऐकल्यावर मी थोडा थबकलोच, मी त्यांना हो मी ५ विकेट घेऊन दाखवेन असं सांगितलं. शिवरामकृष्णन यांच्याकडून मला भारतीय संघाची कॅप मिळाली. त्यांनीही मला काही टिप्स दिल्या. डेव्हिड वॉर्नर हा माझा कसोटीतला पहिला बळी होता. त्याची विकेट घेतल्यानंतर मला हायसं वाटलं.” कुलदीप यादव Cricbuzz संकेतस्थळाच्या Spicy Pitch या कार्यक्रमात बोलत होता.

यानंतर कुलदीपने पुढे अनेक सामन्यांत भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मनगटातून चेंडू वळवण्याच्या आपल्या कौशल्यामुळे कुलदीपची गोलंदाजी अनेक फलंदाजांना समजत नाही. आयपीएलमध्ये कुलदीप कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती सावरल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.