आयपीएल २०२१च्या हंगामात एकाही सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीप यादवने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकही सामना खेळायला न मिळाल्याने कुलदीपने आश्चर्य व्यक्त केले आहे. करोनाने बायो बबलला भेदल्यामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केला.

मागील काही काही काळापासून कुलदीप चांगल्या फॉर्मात नाही. भारतीय संघात आता असे फिरकीपटू आले आहेत, जे फलंदाजी करण्यातही सक्षम आहेत. त्यामुळे कुलदीपकडे दुर्लक्ष केले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याला फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही.

 

इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या खास संभाषणादरम्यान कुलदीप म्हणाला, “आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात संधी न मिळाल्यामुळे मी मानसिकरित्या अस्वस्थ झालो. मी इतका वाईट आहे की काय याचा विचार करण्यास सुरुवात केली. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता आणि त्यांना विचारणे योग्य नव्हते. चेन्नईचा खेळपट्टी फिरकीला पोषक आहे आणि असे असूनही मला खेळायची संधी मिळाली नाही. मला आश्चर्य वाटले, पण काहीही करता आले नाही.”

कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे अनेक क्रीडापंडित आश्चर्यचकित झाले. कुलदीपचा संघात समावेश व्हावा, असा त्यांचा विश्वास होता. करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.