कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

सूर्यापेठ (तेलंगणा) येथे सुरू असलेल्या कु मार-कु मारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने दोन्ही गटांमध्ये विजयी सलामी नोंदवली.

मुलांच्या इ-गटात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीत मध्य प्रदेशचा ४९-४७ असा निसटता पराभव केला. महाराष्ट्राने सलग ३ गुण घेत सुरुवात झोकात केली. पण नंतर मात्र तो जोश राखण्यात ते कमी पडत चालले. त्याचा फायदा घेत मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी १५व्या मिनिटाला महाराष्ट्रावर लोण देत २२-१७ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला २५-२० अशी मध्य प्रदेशकडे आघाडी होती. उत्तरार्धात लोणची परतफेड करीत नाममात्र आघाडी घेतली, पण ती फार काळ टिकली नाही. उत्तरार्धातील १३व्या मिनिटाला दुसरा लोण देत मध्य प्रदेशने पुन्हा आघाडी घेतली. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा ४३-३९अशी आघाडी मध्य प्रदेशकडे होती. पण महाराष्ट्राने आक्रमकतेला संयमाची जोड देत दुसरा लोण देत आघाडी घेतली. ती टिकवत २ गुणांनी विजय साकारला. महाराष्ट्राच्या विजयात शिवम पटारे, आदित्य शिंदे, रोहित बिन्नीवाले यांनी चमकदार खेळ केला.

मुलींच्या ह-गटात महाराष्ट्राने केरळचा ६१-२२ असा धुव्वा उडवला. पूर्वार्धात ३१-१८अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील तुफानी खेळ केला. मानसी रोडे, समृद्धी कोळेकर, हरजितसिंग कौरच्या खेळापुढे केरळचा टिकाव लागला नाही.