पाकिस्तानात २००९ साली श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंच्या बसवर झालेला हल्ला कोणीही कधीच विसरू शकत नाही. क्रिकेट इतिहासातील काळ्या दिवसांपैकी एक असे त्या दिवसाचे वर्णन करता येईल. श्रीलंकन संघ पाकिस्तानात कसोटी मालिका खेळायला गेला होता. सकाळी तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळण्यासाठी श्रीलंकेचा संघ बसमधून निघाला असताना बसवर लाहोरमध्ये मोठा हल्ला झाला. श्रीलंकेन संघाच्या बसमध्ये त्यावेळी माजी कर्णधार कुमार संगकारादेखील होता. तब्बल ११ वर्षांनी त्याने त्या हल्ल्याबद्दलचा अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.

कुमार संगकाराने नुकताच स्काय स्पोर्ट्सशी बोलताना त्या बस हल्ल्याचा थरारक अनुभव कथन केला. “सकाळच्या वेळी आम्ही जेव्हा बसमधून निघाले, तेव्हा आमच्या नेहमीच्या गप्पा सुरू होत्या. आज संध्याकाळी खेळ संपल्यानंतर काय करणार याबद्दल प्रत्येक जण सांगत होता. आमच्यातला एका वेगवान गोलंदाज म्हणाला की इथल्या खेळपट्ट्या एकदम सपाट आहेत, त्यामुळे मला तर संध्याकाळी हाताला फॅक्चर बँडेज बांधावं लागणार आहे. एखादा बॉम्ब पडला तर बरं होईल, आपल्याला घरी तरी जाता येईल. तो हे म्हणाला आणि अवघ्या २० सेकंदानंतर आमच्यावर हल्ला झाला”, असं संगकारा म्हणाला.

“आमच्या सहकारी वर्गातील एक कर्मचारी बसमध्ये अगदी पुढेच बसला होता. आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला, तेव्हा आम्हाला वाटलं की फटाके वाजवत आहेत. तेवढ्यात तो कर्मचारी जोरात ओरडला की सगळ्यांनी खाली लपा. ते लोक आपली बस उडवणार आहेत. दिलशान पण पुढे बसला होता. मी बसच्या मध्यभागी होतो. महेला जयवर्धने आणि मुरलीधरन माझ्या मागे बसले होते आणि समरवीरा माझ्या बाजूला होता, तर परणविताना पुढे होता. आम्ही सगळे बसच्या खालच्या बाजूला लपलो. त्या हल्लेखोरांनी बसवर यथेच्छ गोळीबार केला, ग्रेनेड फेकले, रॉकेट लाँचरचा पण हल्ला चढवला. पण सुदैवाने आम्ही सारे वाचलो. आमच्यातील समरवीरा, मी आणि मेंडिस तिघेही जखमी झालो होतो. परणवितानाच्या छातीतून रक्त वाहत होतं. तो खाली कोसळला आणि म्हणाला की त्याला गोळी लागली आहे. हल्लेखोराने बस ड्रायव्हरला मारायचा प्रयत्न केला, पण तो ड्रायव्हर हिरो ठरला. त्याने या सगळ्यातून आम्हाला कसेबसे बाहेर नेले”, असा अंगावर काटा आणणारा अनुभव त्याने सांगितला.