श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा हा महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिननंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा कुमार संगाकाराच्या नावे आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येदेखील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. आपल्या कारकीर्दीत त्याच्या पिढीतील काही सर्वोत्कृष्ट गोलंदाजांशी संगाकाराने उत्कृष्ट द्वंद्व अनुभवले. त्यापैकी दोन गोलंदाज हे खेळण्यासाठी महाकठीण असल्याचे मत संगाकाराने सांगितले.

“वासिम अक्रम याची गोलंदाजी खेळणं म्हणजे वाईच स्वप्न होतं. भारताच्या जहीर खानची गोलंदाजीदेखील मी अनेकदा खेळलो आहे. त्याच्यासमोर उभं राहून फलंदाजी करणंदेखील खूपच कठीण होतं”, असे संगाकाराने एमसीसीच्या अधिकृत वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आवडता फलंदाज कोण? याबद्दलही संगाकाराने उत्तर दिलं. “सर व्हिव रिचर्ड्स हे माझे सर्वात आवडते फलंदाज होते. ब्रायन लारा येईपर्यंत मला ते आवडायचे. पण लाराचा खेळ पाहिल्यावर आता ते दोघे माझे आवडते फलंदाज आहेत”, असे संगाकारा म्हणाला.

फिक्सिंगच्या आरोपावरून चौकशीला सामोरं गेल्याबद्दल संगाकारा म्हणतो…

“माजी क्रीडामंत्र्यांनी विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेबाबत प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे आम्हाला गुन्हेगारासारखं पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. अशाप्रकारे चौकशीला सामोरं जाणं हे खूपच क्लेशदायक होतं. अशाप्रकारे प्रश्नांची उत्तर देताना आम्हाला वाईट वाटत होतं. पण एका अर्थी आरोप केला गेला ते चांगलंच झालं. त्यामुळे खेळाबद्दलही तपास झाला आणि त्यातून खरं काय ते समोर आलं. या चौकशीतून खेळाबद्दल प्रत्येकालाच योग्य तो संदेश मिळाला आणि खेळाबद्दलचा विश्वास दुणावला”