बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या चेन्नईत झालेल्या तातडीच्या बैठकीत सचिव संजय जगदाळे यांनी राजीनामा परत घेण्यास नकार दिल्यानंतर आता, बीसीसीआयच्या सचिव पदासाठी भारताचे माजी गोलंदाज अनिल कुंबळे तसेच माजी क्रिकेटपटू रणजीब बिस्वाल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अनिल कुंबळे यांनी दोन वर्षांहून अधिक काळ कर्नाटक राज्य क्रिकेट समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. समितीतील सभासदांनी बीसीसीआयच्या सचिव पदासाठी अनिल कुंबळे योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण आणि त्यावरून बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी या सर्वाला अनुसरून सुरू असलेले नाट्य यातून भारताच्या माजी क्रिकेटपटूंना पदाधिकाऱ्यांच्या यादीत सामिल करुन भविष्यात बीसीसीआयची प्रतिमा स्वच्छ राखण्याचा बीसीसीआयचा मानस असेल. तसेच बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांच्या राजकीय क्षेत्रात व्यस्त असल्याने त्यांची यापदावर वर्णी लागण्याची शक्यताही कमी आहे.
बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनिल कुंबळे यांचे एक क्रिकेटर आणि प्रशासक म्हणून नावलौकिक आहे. त्यांनी काही काळ कर्नाटक क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपदही उत्तमरित्या सांभाळले आहे. अनिल कुंबळे बीसीसीआयच्या सचिवपदी विराजमान झाले, तर भारतीय क्रिकटला याचा नक्की फायदा होईल. त्यांच्याशी याबाबत चर्चा अजून करायची आहे आणि आम्हाला आशा आहे की, अनिल कुंबळे ही जबाबदारी सांभाळण्यास होकार देतील.”