कारकीर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात लसिथ मलिंगाचे तीन बळी

कोलंबो : कुशल परेराने साकारलेल्या शतकी खेळीमुळे श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर ९१ धावांनी विजय मिळवला. २२६ सामन्यांमध्ये ३३८ बळी मिळवून एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या लसिथ मलिंगाला श्रीलंकेने गोड निरोप दिला.

कुशल परेराची ९९ चेंडूंत १११ धावांची खेळी तसेच त्याला कुशल मेंडिस (४३) आणि अँजेलो मॅथ्यूज (४८) यांनी साथ दिल्यामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३१४ धावा उभारल्या होत्या. हे उद्दिष्ट गाठताना मुशफिकुर रहीम (६७) आणि शब्बीर रेहमान (६०) यांचा प्रतिकार वगळता बांगलादेशच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. मलिंगानेही तीन मोहरे टिपत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळेला मागे टाकले.