‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दरीखोऱ्यातील शिळा’ असा मराठी गौरवोद्गार करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रजांच्या लेखणीने साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. ज्ञानपीठ पुरस्काराने कुसुमाग्रजांचा सन्मान झाला. ज्या नाशिकमध्ये कुसुमाग्रजांची प्रतिभा बहरली, तेथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रजांच्या नावाने खास अध्यासन सुरू करण्यात आले. नऊ वर्षांचा टप्पा पार करताना अध्यासन अद्याप कुसुमाग्रजांच्या नावे पुरस्कार, कार्यशाळा, काव्य निबंध स्पर्धा ही चौकट ओलांडू शकले नाही, अशी खंत साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी साहित्यात कुसुमाग्रजांचे असणारे महत्त्वपूर्ण योगदान पाहता त्यांच्या साहित्याचा खजिना लेखणीतून उलगडला जावा, यासाठी मुक्त विद्यापीठाने अध्यासनाची संकल्पना मांडली. या संकल्पनेला २००९ मध्ये मूर्त रुप मिळाले. साहित्य क्षेत्रातील नामवंताच्या उपस्थितीत अध्यासनाचे उद्घाटन झाले होते. अध्यासनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे, काव्य, नाटय़ आणि ललित साहित्याच्या क्षेत्रातील सर्जनशील प्रतिभावंताचा यथोचित गौरव करणे, विविध वाड्.मयीन सेवा देणे ही अध्यासनाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. तसेच प्रादेशिकतेची सीमा ओलांडत विविध भाषांतील साहित्यात आपला ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकास कुसुमाग्रजांच्या नावे दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार, सन्मानपत्र देण्याचे ठरले. नवोदितांच्या लेखणीला उभारी मिळावी, यासाठी विशाखा पुरस्कार आदी कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

अध्यासनाच्या नऊ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतल्यास केवळ कार्यशाळा, मराठी दिनानिमित्त निबंध लेखन, काव्यलेखन स्पर्धा, कुसुमाग्रजांच्या नावे पुरस्कार, विशाखा पुरस्काराचे वितरण या पलिकडे हे क्षितिज विस्तारले नाही. वास्तविक विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात अध्यासनासाठी निधीची स्वतंत्र तरतूद आहे. तरीदेखील कुसुमाग्रजाची ग्रंथसंपदा साहित्यप्रेमींपर्यंत पोहचविण्यासाठी तसदी घेतली गेली नाही. अध्यासनात कुसुमाग्रजांचे बालसाहित्यासह अन्य साहित्यसंपदा उपलब्ध आहे. ती आजच्या पिढीपर्यंत पोहचावी, कुसमाग्रजांचे वेगवेगळ्या भावमुद्रा असणारे मोठय़ा आकारातील छायाचित्रे आहेत. ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे यासाठी अध्यासनाने शाळेशी कधी संवाद साधला नाही. महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुखांसोबत कधी चर्चा केली नाही. सध्या विं. दा. करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे त्यांच्या नावे काही कार्यक्रम घेण्याची इच्छा अध्यासनाने व्यक्त केली नाही. कुसुमाग्रजांच्या नावे साहित्यिाशी निगडित स्पर्धाचे नियोजन करता आले असते. अध्यापनासाठी पूर्णवेळ काम करू शकेल असा प्रमुख अपवादाने मिळाला. अध्यासनाची जबाबदारी प्रभारी स्वरुपात दिली असल्याने संबंधितांना दैनंदिन मूळ कामातून मिळणाऱ्या वेळेवर अध्यासनाचे काम अवलंबून आहे.

नेहमीची वाट सोडण्याची मानसिकता नसल्याने अध्यासनाचे काम एका परिघापुरते मर्यादित राहिल्याचा आक्षेप साहित्य वर्तुळातून नोंदविला जात आहे.

साहित्यप्रेमींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न

कुसमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज अध्यासन तसेच मुक्त विद्यापीठ यांच्या सहकार्याने पुढील काळात नव्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांत त्याचा आरंभ होईल. अध्यासनाचे काम मुक्त विद्यापीठासोबत सुरू आहे, यामुळे विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहचण्यात अडचणी येतात. मात्र त्या अडचणींवर मात करत कार्यक्रम यशस्वी होतील.

विजया पाटील (प्रभारी प्रमुख, कुसुमाग्रज अध्यासन, मुक्त विद्यापीठ)

साचेबद्ध काम

कुसुमाग्रज अध्यासनाचे काम गेल्या काही वर्षांपासून साचेबद्ध झाले आहे. हा वारसा नव्या पिढीपर्यंत जाण्यासाठी अनेकविध उपक्रम राबविता येऊ शकतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने काही स्पर्धा, लहान मुलांच्या शैक्षणिक सहली, त्यांच्या सोबत चर्चा, साहित्य-लेखन या अनुषंगाने काही कार्यशाळा तसेच स्पर्धा, वेगवेगळ्या साहित्यकांच्या जन्मशताब्दी किंवा अन्य दिवसाचे औचित्य साधत साहित्यसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यासाठी पूर्णवेळ काम करू शकेल तसेच त्या विषयाची आवड असणारी व्यक्ती हवी.

श्याम पाडेकर (माजी प्रमुख, कुसुमाग्रज अध्यासन)