IPL 2020 मध्ये सुरूवातीच्या सात सामन्यात बाकावर बसणाऱ्या ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने संघात स्थान मिळाल्यावर आपला दर्जा दाखवून दिला. केवळ ७ सामने खेळायला मिळाले असताना त्याने तुफान फटकेबाजी करत २८८ धावा कुटल्या. गेलने पंजाबच्या संघाची फलंदाजीची बाजू भक्कम करत ३ अर्धशतकं ठोकली. त्यापैकी एका सामन्यात तर गेल ९९ धावांवर बाद झाला. IPLनंतर आता ख्रिस गेलचा झंजावात आणखी एका टी२० लीगमध्ये पाहायला मिळणार यासाठी चाहते खुश होते. पण ख्रिस गेलने तडकाफडकी त्या लीगमधून माघार घेतली आहे.

भारतातील IPL आणि पाकिस्तानातील PSL नंतर यंदाच्या वर्षापासून LPLम्हणजेच लंका प्रिमियर लीगलादेखील सुरूवात होणार आहे. भारताचे माजी खेळाडू इरफान पठाण, मुनाफ पटेल, स्थानिक खेळाडू कुशल परेरा, कुशल मेंडिस, नुवान प्रदीप अशा अनुभवी खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. LPLT20 स्पर्धेत कँडी टस्कर्स संघाकडून ख्रिस गेलला करारबद्ध करण्यात आलं होतं. इंग्लंडचा लियम प्लंकेटदेखील याच संघातून खेळणार आहे. मात्र काही कारणास्तव ख्रिस गेलने स्पर्धेच्या या हंगामातून माघार घेतली आहे. कँडी टस्कर्स संघाने स्वत: ट्विट करून याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.

दरम्यान, LPLT20 स्पर्धेत कोलंबो, कँडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना असे ५ संघ एकूण २३ सामने खेळणार आहेत. २६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. २० साखळी सामन्यांनंतर १३ आणि १४ डिसेंबरला दोन उपांत्य सामने खेळले जातील. त्यानंतर १६ डिसेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.