नुकतचं वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची कॅप्टन कूल ही इमेज आपण सर्वच जाणून आहोत. आपल्या याच स्वभावाने धोनीने आतापर्यंत भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मात्र भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला एकदा धोनीच्या रागाचा सामना करावा लागलेला आहे. विक्रम साठ्ये याच्या What the Duck या कार्यक्रमात बोलत असताना कुलदीपने या घटनेचा उल्लेख केला आहे.

डिसेंबर २०१७ रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात इंदूरयेथे दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यादरम्यान धोनी आपल्या सवयीप्रमाणे यष्टींमागून कुलदीपला नेमका चेंडू कसा टाकायचा याच्या सुचना देत होता. एका क्षणाला कुलदीपने धोनीने दिलेली सुचना न ऐकता आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहीसा रागावलेल्या धोनीने कुलदीपला चांगलचं सुनावलं. “मला मूर्ख समजलास का?? मी ३०० वन-डे सामने खेळल्यानंतर इथे पोहचलोय.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोनीने दिलेल्या सल्ल्यानूसार गोलंदाजी केल्यानंतर कुलदीपला लगेच विकेट मिळाली. या सामन्यात कुलदीपने ४ षटकात ५२ धावा देत ३ बळी घेतले. रोहित शर्माने ३५ धावांत केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने हा सामना ८८ धावांनी जिंकला होता. कुलदीप सोबत युझवेंद्र चहलही या कार्यक्रमात सहभागी झाला होता.