पीटीआय, माद्रिद

करिम बेन्झेमाचे दोन गोल आणि माकरे असेन्सियोचा पुनरागमनात एक गोल यामुळे रेयाल माद्रिदने ला-लिगा फुटबॉलमध्ये व्हॅलेन्सियाचा ३-० असा सहज पराभव केला. या विजयासह रेयाल माद्रिदने अव्वल स्थानावरील बार्सिलोनाविरुद्धची पिछाडी दोन गुणांचीच ठेवली.

करोनामुळे ठप्प झालेली ला-लिगा पुन्हा सुरू झाल्यावर बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या दोन अव्वल संघांनी नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात केली आहे. बेन्झेमाने ६१व्या मिनिटाला इडेन हॅझार्डच्या पासवर गोल केला. दुखापतीमुळे हॅझार्डदेखील काही महिने खेळापासून दूर होता. मात्र पुनरागमन केल्यावर हॅझार्डने सलग दुसऱ्या लढतीत त्याचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. गुडघा दुखापतीमुळे १० महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या असेन्सियाने ७४व्या मिनिटाला गोलचे योगदान दिले. असेन्सियाने ८६व्या मिनिटाला अप्रतिम पास देत बेन्झेमाला सामन्यातील दुसरा गोल करण्याची संधी दिली. याउलट व्हॅलेन्सियाची या पराभवामुळे आठव्या स्थानी घसरण झाली आहे.

अन्य लढतींमध्ये रेयाल सोशायदादला अल्वेसकडून ०-२ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे सोशायदादचे चौथे स्थान मिळवण्याची संधी हुकली. त्यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.

१६ बेन्झेमाचा हा ला-लिगा हंगामातील १६वा गोल ठरला.

५ या हंगामात पाचव्यांदा त्याने एका सामन्यात दोन गोलांची नोंद केली.

५ रेयाल माद्रिदकडून सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये बेन्झेमाने फेरेन्क पुस्कासला मागे टाकत पाचवा क्रमांक मिळवला आहे.