निर्णायक गोलमुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदवर मात

दडपणाच्या परिस्थितीत नेहमीच संघासाठी धावून येणाऱ्या लिओनेल मेसीने पुन्हा एकदा बार्सिलोनाला तारले. त्याने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी रात्री झालेल्या ला लिगा फुटबॉलमधील सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदवर १-० असा विजय मिळवला.

वँडा मेट्रोपोलिटॅनो स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये गोल करण्यासाठी कडवी झुंज पाहावयास मिळाली. पहिल्या सत्रात दोघांनाही गोल करण्यात अपयश आले. यापूर्वी अ‍ॅटलेटिकोकडून खेळणाऱ्या अ‍ॅन्टोइन ग्रीझमनने उत्तरार्धात बार्सिलोनासाठी गोल करण्याची संधी निर्माण केली. परंतु चेंडू गोलजाळ्याच्या वरून गेल्याने बार्सिलोनाला खाते उघडण्यात अपयश आले.

मात्र विक्रमी सहाव्या ‘बलोन डी ओर’ पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ३२ वर्षीय मेसीने ८६व्या मिनिटाला लुईस सुआरेझच्या पासचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला १-० अशी सरशी साधून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थान पटकावले असून त्यांच्या आणि रेयाल माद्रिदच्या खात्यात प्रत्येकी ३१ गुण आहेत. परंतु बार्सिलोनाने रेयालच्या तुलनेत (१४ सामन्यांत १० विजय) एक विजय अधिक मिळवल्यामुळे ते अव्वल क्रमांकावर आहेत. अ‍ॅटलेटिको २५ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

१२ मेसीने ला लिगाच्या यंदाच्या हंगामात एकूण १२ गोल नोंदवले असून गेल्या पाच सामन्यांत त्याचा हा सहावा गोल ठरला.

१९ अ‍ॅटलेटिको माद्रिदला बार्सिलोनाविरुद्धच्या ला लिगामधील तब्बल गेल्या १९ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

३० आतापर्यंतच्या कारकीर्दीत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध मेसीने ३० गोल नोंदवले असून सेव्हिलाविरुद्ध त्याने सर्वाधिक ३७ गोल झळकावले आहेत.