गतविजेत्या रेयाल माद्रिदला ला-लिगा फुटबॉलमध्ये अल्वेसकडून १-२ असा पराभवाचा धक्का बसला. याउलट बार्सिलोनाने लिओनेल मेसीच्या गोलच्या जोरावर ओसासुनाचा ४-० असा पराभव केला.
यंदाच्या हंगामात प्रभावी ठरू न शकलेल्या बार्सिलोनाने या विजयासह सातवे स्थान मिळवले आहे. मार्टिन ब्रेथवेट (२९वे मिनिट), अॅँटोनी ग्रिझमन (४२वे मिनिट), फिलिप कोटिनो (५७वे मिनिट) आणि मेसी (७३वे मिनिट) यांचा प्रत्येकी एक गोल बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा ठरला. याउलट रेयाल माद्रिदला या लीगमध्ये यंदा सलग तिसऱ्या लढतीत विजय नोंदवण्याची कामगिरी करता आली नाही. अल्वेसकडून लुकास पेरेझने पाचव्या मिनिटाला पेनल्टीवर आणि जोसेलूने ४९व्या मिनिटाला गोल केले. रेयाल माद्रिदकडून एकमेव गोल कॅसेमिरोने (८६व्या मिनिटाला) केला.
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल – वेस्ट ब्रॉमविचचा पहिला विजय
वेस्ट ब्रॉमविच : वेस्ट ब्रॉमविच अल्बियनने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) शेफिल्ड युनायटेडला १-० असे पराभूत करत पहिला विजय नोंदवला. शेफिल्ड युनायटेडला मात्र अद्याप पहिला विजय ‘ईपीएल’मध्ये मिळवता आला नाही. कॉनर गॅलॅघेरने १३व्या मिनिटाला केलेला गोल वेस्ट ब्रॉमविचला जिंकून देणारा ठरला.
सेरी-ए लीग फुटबॉल – इंटर मिलान विजयासह दुसऱ्या स्थानी
मिलान : इंटर मिलानने सेरी-ए लीग फुटबॉलमध्ये ससूओलोवर ३-० असा विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले. यंदाच्या हंगामात दणदणीत कामगिरी करणाऱ्या ससूओलोचा हा लीगमधील पहिलाच पराभव ठरला. इंटर मिलान आणि ससूओलोचे ९ सामन्यांतून समान १८ गुण आहेत. मात्र सरस गोल फरकाच्या आधारे इंटर मिलानने दुसरे स्थान मिळवले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 30, 2020 3:07 am