‘क्लबमधील प्रत्येक खेळाडूने माझ्या दर्जाला साजेसा खेळ केला असता, तर ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या विजेतेपदावर रिअल माद्रिदने नाव कोरले असते! ’’ अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबविरुद्धच्या पराभवानंतर रिअल माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर सर्वानी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी रोनाल्डोला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याने अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करू नये, असा सल्लाही अनेकांनी दिला. टीकेच्या अनेक ‘फ्री किक’नंतर रोनाल्डोने संघसहकाऱ्यांची माफी मागितली. पण त्याच्या आक्रोशामागील कारण कुणी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. संघात मातब्बर खेळाडूंची फौज असूनही केवळ एकाच खेळाडूला विजयासाठी झगडावे लागत असेल तर त्याच्याकडून आणखी कोणती प्रतिक्रिया व्यक्त होणार?

फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. कुणी एक अमका अव्वल खेळाडू एकटय़ाच्या जीवावर विजय मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी त्याला सहकाऱ्यांचा हातभार आवश्यक आहे. अ‍ॅटलेटिकोविरुद्धच्या पराभवानंतर माद्रिद ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आणि त्या रागातूनच रोनाल्डोची प्रतिक्रिया आली. गेल्या वर्षभरातील माद्रिदच्या कामगिरीवर आणि एकूणच कारभारावर लक्ष घातल्यास ‘सारे काही आलबेल’ असे कुणी म्हणणारच नाही.

प्रशिक्षक कार्लो अँसेलोट्टी यांच्या हकालपट्टीनंतर आलेल्या राफेल बेनिटेझ यांची अवघ्या काही महिन्यांतच उचलबांगडी केली. त्यांच्यानंतर झिनेदीन झिदान यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या सततच्या बदलामुळे क्लबमधील खेळाडूंची मानसिकताही खचली आणि त्यामुळे या एका वर्षांच्या कालावधीत माद्रिदच्या वाटय़ाला अपयश आले. अँसेलोट्टी यांच्या दोन वर्षांच्या कालखंडात कोपा डेल रे, युएफा चॅम्पियन्स लीग, युएफा सुपर चषक आणि फिफा क्लब विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या माद्रिदची पाटी ३ जून २०१५नंतर कोरीच राहिली. एकामागून एक अपयश त्यांच्या वाटय़ाला येत होते. त्यात सहकाऱ्यांकडून पुरेशी साथ मिळत नसल्याची सल रोनाल्डोला बोचत होती आणि अ‍ॅटलेटिकोविरुद्धच्या सामन्यानंतर ती शब्दरूपाने बाहेर पडली. त्यात प्रतिस्पर्धी बार्सिलोना आणि लिओनेल मेस्सी यांची घोडदौड पाहून रोनाल्डोमध्ये असूया निर्माण होणे साहजिकच होते.

एकीकडे नेयमार आणि लुइस सुआरेझसारख्या सहकाऱ्यांच्या जोरावर मेस्सी विक्रमांचे इमले रचत आहे, तर गॅरेथ बॅले, करिम बेंझेमा, जेम्स रॉड्रिग्ज या मातब्बरांकडून पुरेशी साथ मिळत नसल्यामुळे रोनाल्डोच्या नाराजीत भर पडली. माद्रिद आणि बार्सिलोना यांच्या गोलफलकावर नजर टाकल्यास दोन्ही एकमेकांना तोडीस तोड उत्तर देतात हेच दिसून येते. २७ लढतींनंतर दोन्ही संघांनी प्रतिस्पध्र्याविरोधात ७४ गोल केले, तर गोल स्वीकारण्यामध्ये माद्रिद (२६) आणि बार्सिलोना (२२) यांच्यात फार फरक नाही. त्यामुळे या दोघांनी जेतेपदावर दावा करणे योग्य आहे. मात्र आता जेतेपदासाठी अ‍ॅटलेटिको आणि बार्सिलोना यांच्यात शर्यत आहे.

अ‍ॅटलेटिकोने २७ सामन्यांनंतर केवळ ३९ गोल केले आहेत. हा आकडा पाहून रोनाल्डो संतप्त होणे स्वाभाविक आहे. प्रतिस्पर्धी संघांना एकहाती नमवण्याची किमया रोनाल्डोमध्ये असली तरी किती काळ त्याने एकटय़ाने झटावे, हा खरा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे मेस्सीला सहकाऱ्यांची साथ लाभते, त्या तुलनेत रोनाल्डो कमनशिबी म्हणावा लागेल. याचा अर्थ त्याचे सहकारी त्याला सहकार्य करत नाहीत, असे नाही. परंतु ते कुठेतरी कमी पडतात हे खरे. किमान त्याच्या वेदना समजून घेऊन संघसहकाऱ्यांनी पुढील वाटचालीत त्याला साथ द्यावी एवढीच इच्छा. तूर्तास, रोनाल्डोवर टीका करणाऱ्यांनी तरी त्याचे काय चुकले? याचा गांभीर्याने पुनर्विचार करावा.

swadesh.ghanekar@expressindia.com