बार्सिलोना : बार्सिलोनासाठी ला लिगा फुटबॉलमधील ५०५वा सामना खेळणाऱ्या लिओनेल मेसीने पुन्हा एकदा आपल्या खेळाची जादू दाखवली. त्याने दोन गोल नोंदवून एका गोलसाठी केलेल्या साहाय्यामुळे बार्सिलोनाने शनिवारी अलाव्हेसचा ५-१ असा धुव्वा उडवला.

स्पेनचा माजी खेळाडू झावी हर्नांडेझ बार्सिलोनासाठी ला लिगामध्ये ५०५ सामने खेळला होता. मेसीने त्या विक्रमाची बरोबरी साधताना अनुक्रमे ४६व्या आणि ७५व्या मिनिटाला गोल केले. फ्रान्सिस्को ट्रिनकाओनेसुद्धा (२९ आणि ७४वे मिनिट) दोन गोल झळकावून मेसीला सुरेख साथ दिली, तर जुनिअर फिप्रोने ८०व्या मिनिटाला गोल नोंदवला. अलाव्हेससाठी लुईस रोझाने एकमेव गोल केला.

सेरी-ए  लीग फुटबॉल  :- रोनाल्डो निष्प्रभ; युव्हेंटसचा पराभव

तुरिन : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अपयशाचा युव्हेंटसला फटका बसला. सेरी-ए  लीग फुटबॉलमध्ये लोरेंझो इन्साइनने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर नापोलीने युव्हेंटसवर १-० अशी सरशी साधली. या पराभवामुळे युव्हेंटस (२१ सामन्यांतील ४ गुण) जेतेपदाच्या शर्यतीत पिछाडीवर पडला आहे. एसी मिलान अग्रस्थानी विराजमान आहे.