लिओनेल मेसी बार्सिलोनासाठी पुन्हा एकदा धावून आला. दुसऱ्या सत्रात त्याने केलेल्या दोन गोलमुळे बार्सिलोनाने ला-लीगा फुटबॉलमध्ये व्हॅलेंसियाचा ३-२ असा पराभव केला. बार्सिलोनाच्या विजयामुळे ला-लीगा जेतेपदासाठीची शर्यत आणखी रंगणार आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिद ७६ गुणांसह आघाडीवर असून रेयाल माद्रिद-बार्सिलोनाने प्रत्येकी ७४ गुणांसह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

सेरी-ए लीग फुटबॉल : इंटर मिलानला २०१०नंतर प्रथमच जेतेपद

मिलान : इंटर मिलानने गेल्या ११ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत युव्हेंटसची नऊ वर्षांपासूनची मक्तेदारी मोडीत काढली.अँटोनियो कोन्टे यांच्या प्रशिक्षक पदाखाली खेळणाऱ्या इंटर मिलानचे हे १९वे जेतेपद ठरले. रविवारी अ‍ॅटलांटाला सासुओलोविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागल्याने इंटर मिलानने चार सामने शिल्लक राखून १३ गुणांची आघाडी घेतली आहे. चार सामन्यांआधीच जेतेपद निश्चित झाल्यानंतर मिलान शहरात सर्व चाहत्यांनी चौकात एकत्र येत कारचे हॉर्न वाजवून जल्लोष केला. हजारो चाहत्यांनी पिआझ्झा डुओमो येथे एकत्र येत करोनाचे नियम पायदळी तुडवत जोरजोरात घोषणा देत इंटर मिलानच्या विजयाचा आनंद साजरा केला.

अंतिम फेरी गाठण्यासाठी मँचेस्टर सिटी उत्सुक

मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात पॅरिस सेंट-जर्मेनवर २-१ अशी सरशी साधली. आता मंगळवारी मध्यरात्री घरच्या मैदानावर रंगणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात सेंट-जर्मेनपेक्षा चांगली कामगिरी करून अंतिम फेरी गाठण्याकडे सिटीचे लक्ष लागले आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये सिटीने सेंट-जर्मेनविरुद्ध गेल्या चार सामन्यांत एकही पराभव पत्करलेला नाही.

’ वेळ : मध्यरात्री १२.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३