करीम बेंझेमाने दिलेल्या अप्रतिम पासवर कॅसेमिरोने केलेल्या गोलमुळे रेयाल माद्रिदने इस्पान्योलचे आव्हान १-० असे मोडीत काढत ला-लीगा फुटबॉल विजेतेपदाच्या दिशेने कूच केली.

बार्सिलोनाला गेल्या सामन्यात सेल्टा व्हिगोविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली होती. त्यामुळे रेयाल माद्रिदला अग्रस्थान काबीज करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत रेयाल माद्रिदने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात विजय मिळवून ३२ सामन्यांत ७१ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे. बरोबरीमुळे बार्सिलोनाला दोन गुण गमवावे लागल्यामुळे त्यांची ६९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यामुळे रेयाल माद्रिदलाच विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहे.

इस्पान्योलने मध्यंतरापर्यंत रेयाल माद्रिदला रोखून धरले होते. पण बेंझेमाने अप्रतिम चाल रचत इस्पान्योलचा भक्कम बचाव भेदला. बचावपटू बेर्नाडरे इस्पिनोसा याच्या पायांमधून त्याने चेंडू कॅसेमिरोकडे पास दिला. कॅसेमिरोने कोणतीही चूक न करता चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली आणि रेयाल माद्रिदला आघाडीवर आणले. त्यानंतर हाच गोल रेयालच्या विजयात निर्णायक ठरला. ठाळेबंदीनंतर स्पर्धेला सुरुवात झाल्यावर रेयाल माद्रिदचा हा सलग पाचवा विजय ठरला.

‘‘फुटबॉल हा खेळ किती महत्त्वाचा आहे, हे मला उमगले. गोलसाहाय्य अप्रतिम असले तरी कॅसेमिरोने त्यानंतर केलेली कामगिरी सर्वात मोलाची आहे. हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही बार्सिलोनाच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे मी म्हणणार नाही. मात्र आमच्या लढती आम्हाला जिंकाव्या लागतील. आता प्रत्येक सामना अंतिम सामन्यासारखाच आहे,’’ असे बेंझेमाने सांगितले.