ला-लीगा फुटबॉलमधील अखेरच्या सामन्यात लिओनेल मेसीने दोन गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. मात्र सलग सातव्या मोसमात सर्वाधिक गोलची नोंद करत मेसीने विक्रमी जेतेपद पटकावले.

मेसीने यंदाच्या मोसमात २५ गोलची नोंद केली. रेयाल माद्रिदच्या करीम बेन्झेमापेक्षा त्याने चार गोल अधिक लगावले. रेयाल माद्रिदने लेगानेसविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. पण या सामन्यात बेन्झेमाला गोल करता आला नाही. सात विविध मोसमांत सर्वाधिक गोल लगावणारा मेसी हा ला-लीगामधील एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. दुखापतीमुळे त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळता आले नाही तरी ३३ सामन्यांमध्ये त्याने ही करामत केली.

मेसीने सलग चार मोसमांत सर्वाधिक गोल करत ह्य़ुगो सांचेझच्या कामगिरीशी बरोबरी साधली. ‘‘वैयक्तिक कामगिरीला माझ्यासाठी दुय्यम स्थान असते. ला-लीगाच्या विजेतेपदासह हे जेतपद मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता,’’ असे मेसीने म्हटले आहे. सलग तिसऱ्या मोसमात सर्वाधिक २१ वेळा त्याने गोलसाहाय्यकाची जबाबदारी निभावली.

दरम्यान, इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅमने लिसेस्टर सिटीचा ३-० असा पाडाव केला. जेम्स जस्टिनच्या स्वयंगोलमुळे टॉटनहॅमला आघाडी मिळाल्यानंतर हॅरी के नने ३७व्या आणि ४०व्या मिनिटाला गोल करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

एफए चषक फुटबॉल स्पर्धा : चेल्सी अंतिम फेरीत

गोलरक्षक डेव्हिड डे गिया याने केलेल्या चुकीमुळे चेल्सीने मँचेस्टर युनायटेडचा ३-१ असा पराभव करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फे रीत धडक मारली. डे गियाच्या दोन चुकांमुळे चेल्सीला विजय मिळवता आला. चेल्सीकडून ऑलिव्हिएर गिरौड, मसोन माउंट आणि हॅरी मगायरे यांनी गोल केले. आता १ ऑगस्ट रोजी नॅशनल स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम फेरीत चेल्सीची गाठ अर्सेनलशी पडणार आहे. अर्सेनलने मँचेस्टर सिटीला २-० अशी धूळ चारली. पाएरे-एमेरिक ऑबामेयांग याचे दोन गोल अर्सेनलच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.

‘बलॉन डीऑर’ पुरस्कार सोहळा रद्द

करोनाच्या साथीमुळे फु टबॉल मोसमात व्यत्यय आल्यामुळे यंदाचा प्रतिष्ठेचा ‘बलॉन डीऑर’ पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला आहे. फ्रान्स फु टबॉल मॅगझिनतर्फे  १९५६ पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला या पुरस्काराने गौरवण्यात येते. लिओनेल मेसीने विक्रमी सहा वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.