भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचे नाव जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये घेतले जाते. मात्र, केरळाच्या या खेळाडूला भारताकडे अनुभवी गोलरक्षकांची फळीच नसल्याची चिंता वाटते. हीच बाब भारताच्या रियो ऑलिम्पिक प्रवासात मोठा अडथळा ठरू शकते, असेही त्याला वाटते.
नुकत्याच झालेल्या अझलन शाह हॉकी चषक स्पध्रेत भारताने श्रीजेशच्या भक्कम बचावामुळे कांस्यपदकावर कब्जा केला. श्रीजेशने दोन पेनल्टी वाचवून भारताला कोरियावर ४-१ असा विजय मिळवून दिला.
श्रीजेश म्हणाला की, ‘‘हरजोत सिंग आणि सुशांत तिर्की या राखीव गोलरक्षकांना आंतरराष्ट्रीय स्थरावर अधिकाधिक खेळण्याची संधी दिली पाहिजे. तसे केल्यास भविष्यात कोणत्याही क्षणी संघाला गरज पडल्यास ते कामी येऊ शकतात. भारताबाहेरील स्पर्धामध्ये राखीव गोलरक्षकांची गैरहजेरी मोठी चिंतेची बाब आहे.’’
‘‘हरजोत आणि सुशांत संघासोबत असतात व त्यांच्याकडून ते सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्नही करतात. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय स्थरावर हवा असलेला अनुभव मिळत नाही. अनुभवातूनच एक उत्तम गोलरक्षक घडतो.’’, असेही तो म्हणाला.