ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये उपकर्णधार रोहित शर्मा का खेळू शकला नाही, याबाबत मीसुद्धा अनभिज्ञ आहे. परंतु रोहितच्या दुखापतीच्या स्थितीबाबत स्पष्टतेचा अभाव आणि गोंधळच अधिक होता, असे ताशेरे विराटने ओढले आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीआधीच रोहितने आपल्या अनुपलब्धतेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले होते. ‘आयपीएल’मधील दुखापतीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी खेळणार नसल्याचे रोहितने ई-मेलद्वारे स्पष्ट केले होते, अशी माहिती विराटने पत्रकार परिषदेत दिली. मांडीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर रोहित सध्या बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करीत आहे.

‘‘रोहित ‘आयपीएल’मध्ये खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही निघेल अशी अपेक्षा होती, परंतु तो नसल्याबाबत पुरेशी स्पष्टता नाही,’’ असे विराटने म्हटले आहे.

जागतिक कसोटी स्पर्धेची गुणपद्धती समजण्यास अवघड!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सुधारलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणपद्धती समजण्यास अवघड आहे, असे विराटने म्हटले आहे. ‘आयसीसी’ गुणपद्धतीत सुधारणा केल्यानंतर भारताची अग्रस्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. भारताने चार मालिकांमधून ३६० गुण मिळवल्यामुळे टक्केवारी ७५ टक्के झाली, तर ऑस्ट्रेलियाने तीन मालिकांमधून २९६ गुण मिळवल्याने ८२.२२ टक्के गुण झाले. नव्या गुणपद्धतीचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे, असे विराट म्हणाला.