सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाच्या संस्कृ तीवर विश्वविजेत्या संघातील माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने टिकेची झोड उठवली आहे. या भारतीय संघात पुरेसे आदर्शवत खेळाडू नसले तरी वरिष्ठांबाबतचा आदर युवा खेळाडूंमध्ये दिसत नाही. समाजमाध्यमांमुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होत असते, असे युवराजने एकदिवसीय क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्माला सांगितले.

‘इन्स्टाग्राम लाइव्ह’च्या माध्यमातून मंगळवारी रात्री युवराजने रोहितशी संवाद साधला. सध्याचा आणि काही वर्षांपूर्वीचा भारतीय संघ यांच्यातील फरक तू कसा मांडशील, या प्रश्नाला युवराजने विश्लेषणात्मक उत्तर दिले.

‘‘जेव्हा माझे आणि तुझे भारतीय संघात पदार्पण झाले, तेव्हा आपले वरिष्ठ खेळाडू शिस्तबद्ध होते. त्या वेळी समाजमाध्यमांचा इतका पगडा नव्हता. त्यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होत नव्हते,’’ असे युवराजने सांगितले.

‘‘खेळाडू लोकांशी किंवा माध्यमांशी कसे बोलतात, त्यावरून त्यांची वृत्ती दिसून येते. ते खेळाचे सदिच्छादूत आहेत, याचे भान जोपसण्याची आवश्यकता आहे. पण हे प्रत्येकाबाबत म्हणता येणार नाही,’’ असे युवराजने स्पष्टीकरण दिले.

‘‘भारताकडून खेळायला सुरुवात झाल्यावर आपली प्रतिमासुद्धा उत्तम राखा, असा सल्ला मी युवा खेळाडूंना देईन. पण सध्याची पिढी बेफिकीर आढळते. तू आणि विराट हे दोघेच वरिष्ठ खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळत आहेत. बाकीच्या खेळाडूंचे संघात आत-बाहेर सुरू आहे,’’ असे युवराज म्हणाला.

‘‘सध्याच्या संघातील फार थोडय़ा खेळाडूंना वरिष्ठांविषयी आदर आहे. बाकीचे कुणीही कुणालाही काही बोलतो. माझ्या कारकीर्दीत वरिष्ठ खेळाडूंबाबत आम्ही जागरूक असायचो. कारण आम्ही के लेल्या चुकांबाबतच्या त्यांच्या टिप्पणीचे भय असायचे,’’ अशी टीका युवराजने केली.

‘कॉफी वुइथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पंडय़ा आणि के . एल. राहुल यांनी केलेले महिलांसंदर्भातील भाष्य गाजले होते. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते. आमच्या काळात अशा प्रकारे घटना झाल्या नाहीत, असे युवराजने सांगितले.

या घटनेविषयी मौन बाळगत रोहित म्हणाला, ‘‘मी जेव्हा भारतीय संघात आलो, तेव्हा बरेच वरिष्ठ खेळाडू संघात होते. फक्त मी, पीयूष चावला आणि सुरेश रैना नवखे होतो. परंतु संघातील वातावरण सौम्य असायचे.’’

नव्या पिढीला कसोटी  क्रिकेट नकोय!

‘‘तुम्ही मैदानावर उत्तम कामगिरी बजावली, तर बाकीच्यांनाही त्यातून प्रेरणा मिळते, हे सचिन तेंडुलकरचे वाक्य मला नेहमीच आठवते. एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मी युवा खेळाडूंशी संवाद साधला, तेव्हा त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये रस नसल्याचे कळले, ते एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्यात समाधानी आहेत,’’ असे युवराजने सांगितले. जेव्हा भारतीय संघातील खेळाडूंचे सामने नसतील, तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे, असा सल्ला युवराजने दिला.