जागतिक दर्जाचे गोलंदाज हे कसोटी क्रिकेटची खरी शान असून अशाच गोलंदाजांची सध्या कसोटीला कमतरता जाणवत आहे, अशी खंत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.

१९७०-८०च्या काळात सुनील गावस्कर विरुद्ध अँडी रॉबर्ट्स किंवा डेनिस लिली, त्याचप्रमाणे १९९०-२०००च्या कालखंडात सचिन विरुद्ध शोएब अख्तर किंवा ग्लेन मॅकग्रा यांच्यातील झुंज पाहायला मिळायची; परंतु आत मोजकेच दर्जेदार गोलंदाज असल्याने फलंदाजांसमोरील आव्हान कमी झाले आहे, असे २०० कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सचिनला वाटते.

‘‘पूर्वी ज्याप्रमाणे चाहते खेळाडूंमधील द्वंद्वासाठी उत्सुक असायचे, तसे आता फारसे आढळत नाहीत. यामागील प्रमुख कारण म्हणजे सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये हातावर मोजण्याइतकेच जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाजांनी त्यांचा दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे,’’ असे ४६ वर्षीय सचिन म्हणाला. ३० वर्षांपूर्वी १५ नोव्हेंबर १९८९ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याच पाश्र्वभूमीवर क्रिकेटमधील परिवर्तनाविषयी सचिनने आपले मत मांडले.

‘‘क्रिकेटचा दर्जा खूप खालावला असून विशेषत: कसोटी सामन्यांसाठी हे फार धोकादायक आहे. त्याकरिता सामन्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या खेळपट्टय़ांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कसोटीसाठी फक्त फलंदाजांना पोषक खेळपट्टय़ा बनवण्यापेक्षा वेगवान आणि फिरकी या दोन्ही गोलंदाजांना साहाय्य लाभेल, अशा खेळपट्टय़ा बनवल्यास सामन्यातील रंगत टिकून राहील,’’ असेही सचिनने सांगितले.

या वर्षी झालेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेचे उदाहरण देताना अशाच प्रकारच्या खेळपट्टय़ा जगभरातही तयार कराव्यात, असे सचिनने नमूद केले. त्याचप्रमाणे कसोटी प्रकारात भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीनच संघ एकमेकांच्या तोडीस तोड वाटतात, असेही सचिनने सांगितले.