युरोप दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला येथील प्रदर्शनीय लढतीत डेन बॉश इलेव्हनकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

डेन बॉश संघाच्या विजयात इरीन व्हानडेन हिने दोन गोल करीत महत्त्वाचा वाटा उचलला. तिने १२व्या व ४५व्या मिनिटाला हे गोल केले. इम्के होईक हिने ५७व्या मिनिटाला एक गोल करीत तिला चांगली साथ दिली. भारताकडून नवदीप कौरने ४७व्या मिनिटाला संघाचा एकमेव गोल नोंदविला.

सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी चांगल्या चाली केल्या, मात्र गोल करण्याबाबत असलेल्या कमकुवतपणामुळे त्यांना खाते उघडता आले नाही. याउलट डेन बॉश संघाने १२व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचा पुरेपूर लाभ घेतला. इरीने त्यावर अचूक गोल केला. २२व्या मिनिटाला भारताच्या लालरेम सियामीने गोल करण्याच्या उद्देशाने जोरदार फटका मारला मात्र तिचा फटका डेन बॉश संघाच्या गोलरक्षकाला चकवू शकला नाही. भारताची गोलरक्षक सविताने त्यानंतर संघावर आलेले आक्रमण थोपविले. डेन बॉश संघात नेदरलॅण्ड्सच्या राष्ट्रीय संघातील नऊ खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा विजय अपेक्षित होता. इरीनने ४५व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या तिसऱ्या डावात भारताने सविताऐवजी रजनी एटिमारपू हिच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी सोपविली. तिने ३३व्या मिनिटाला सूर मारून गोल अडवला. ३६व्या मिनिटाला भारताची कर्णधार राणीने गोल नोंदविण्यासाठी केलेला प्रयत्न असफल ठरला. ४७व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी लाभली. त्याचा फायदा घेत नवदीपने संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांनी भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला, मात्र त्याचा फायदा घेण्यात भारताला अपयश आले. ५७व्या मिनिटाला डेन बॉश संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा लाभ उठवत होईकने गोल केला व संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कायम ठेवीत त्यांनी सामना जिंकला.