बांगलादेश चॅलेंजर बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने रविवारी मलेशियाच्या लिऑंग जून हाओचा सरळ गेममध्ये पराभव करून बांगलादेश आंतरराष्ट्रीय चॅलेंजर बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. हे त्याचे हंगामातील पाचवे विजेतेपद ठरले.

१८ वर्षीय लक्ष्यसाठी चालू वर्ष यशोदायी ठरले. त्याने सात स्पर्धापैकी पाचव्या स्पर्धेत जेतेपद पटकावताना अंतिम सामन्यात लिआँगला २२-२०, २१-१८ असे नामोहरम केले.

उत्तराखंडच्या लक्ष्यने राजेश वर्माचा २१-५, २१-१० असा पराभव करून या स्पर्धेतील विजयी अभियानाला प्रारंभ केला. मग अंतिम फेरीच्या वाटचालीत मलेशियाच्या तिघांना पराभूत केले. दुसऱ्या फेरीत लक्ष्यने एमडी टॅह एम. झियादचा २१-१३, २१-६ असा पराभव केला. मग ऐसिल सोलेह अलीह सॅडिकिनचा २१-१७, २१-९ असा, तर एनजी झी याँगचा २१-९, २१-११ असा पराभव केला.

लक्ष्यने सप्टेंबरमध्ये बेल्जियम आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वर्षांतील पहिले जेतेपद पटकावले. मग डच, सॅरलॉरलक्स आणि स्कॉटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धावर नाव कोरले.

पुरुष व महिला दुहेरीत भारताला उपविजेतेपद मिळाले. महिलांमध्ये मलेशियाच्या अग्रमानांकित टॅन पीयर्ली कूंग ली आणि टिना मुरलीधर जोडीने मनीषा के. आणि ऋतापर्णा पंडा जोडीचा २२-२०, २१-१९ असा पराभव केला. पुरुषांमध्ये मलेशियाच्या चौथ्या मानांकित यी जून चँग आणि काय वून टी जोडीने एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला.

बांगलादेशमध्ये पाचवे आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावून वर्षांचा शेवट विजेतेपदासह करणे आनंददायी आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२०मध्येही हे सातत्य कायम राहो, अशी आशा आहे.

– लक्ष्य सेन