मार्खाम (कॅनडा) : युवा भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने चायनीज तैपेईच्या चेन शिआऊ चेंगला नमवून जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.जुलै महिन्यात आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या १७ वर्षीय लक्ष्यने नवव्या मानांकित चेनचा १५-२१, २१-१७, २१-१४ असा पराभव केला. लक्ष्यची मलेशियाच्या शोलेह अली सदिकिनशी उपांत्य फेरीत गाठ पडणार आहे.

सलामीच्या सामन्यात पुढे चाल मिळालेल्या लक्ष्यने दुसऱ्या फेरीत मेक्सिकोच्या अर्माडो गेटॅनला सरळ गेम्समध्ये हरवले होते.

पुरुष दुहेरीत विष्णू वर्धन गौड पांजाला आणि श्रीकृष्ण साई कुमार पोडिले जोडीने इंडोनेशियाच्या ड्विकी राफियान रेस्टू आणि बर्नाडस बागास कुसुमा वर्दाना जोडीचा २१-११, २१-१७ असा पराभव केला.