बेल्जियम खुली बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने द्वितीय मानांकित डेन्मार्कच्याच व्हिक्टर स्वेंडसेन याचा शनिवारी पराभव करीत बेल्जियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

आशियाई कनिष्ठ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या १८ वर्षीय लक्ष्यने ३४ मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिक्टरचा २१-१४, २१-१५ असा पराभव केला.

लक्ष्यने शुक्रवारी डेन्मार्कच्या किम ब्रूनचा २१-१८, २१-११ असा पराभव केला. लक्ष्य आणि ब्रून यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना एकतर्फी झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच दोघेही चांगला खेळ करत असल्यामुळे आलटून-पालटून दोघेही आघाडीवर येत होते. पण लक्ष्यपेक्षा दमदार कामगिरी करत ब्रून याने ११-९ अशी आगेकूच केली. लक्ष्यने ही पिछाडी भरून काढत १३-१२ अशी मजल मारली. त्यानंतर अखेपर्यंत आपल्याकडील आघाडी टिकवत त्याने २१-१८ अशा फरकाने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये पूर्णपणे लक्ष्यचे वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या सेटमध्ये ब्रून याला डोके वर काढण्याची कोणतीही संधी न देता लक्ष्य याने ६-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने सलग पाच गुण मिळवत ११-३ अशी भक्कम आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केली. दमदार स्मॅशेसचे फटके लगावत लक्ष्यने पुन्हा एकदा सलग पाच गुण मिळवत आपल्या विजयावर मोहोर उमटवली.