भारतीय संघाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-झिम्बाब्वे तिरंगी मालिकेपासून राजपूत आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील. २००७ साली पहिल्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे राजपूत व्यवस्थापक होते. यानंतर त्यांनी अफगाणिस्तानच्या संघाला प्रशिक्षण दिलं होतं. त्यांच्यात मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला होता.

झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनच्या ट्विटर हँडलवरुन राजपूत यांच्या नेमणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.

भारतीय संघाकडून लालचंद राजपूत यांनी २ कसोटी सामने आणि ४ वन-डे सामने खेळले आहेत. हिथ स्ट्रिक यांच्या राजीनाम्यानंतर लालचंद राजपूत यांच्या हातात संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र देण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत झिम्बाब्वेचा संघ मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवू शकला नव्हता. त्यामुळे राजपूत यांच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.