आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांना आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या निरीक्षकांनी मोदी यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोदी यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे. परंतु तरीही त्यांनी या निवडणुकीसाठी १६ डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट असोसिएशनला निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली होती.
या निवडणुकीकरिता सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र मोहन कासलीवाल यांची प्रधान निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कासलीवाल यांनी मोदी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जाला बुधवारी अनुकूलता दर्शवली. रामपाल शर्मा यांच्या वकिलाने घेतलेला आक्षेप या वेळी फेटाळून लावण्यात आला.
भिलवाडा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शर्मा हे सध्या राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर असलेल्या सी. पी. जोशी यांचे निकटवर्ती मानले जातात. मोदी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यास बीसीसीआयकडून राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर कारवाई केली जाईल, म्हणून हा अर्ज करण्यात आला आहे, असे शर्मा यांनी सांगितले.