महाराष्ट्राच्या ललिता बाबरने वुहान येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत ललिताने ९ मिनिटे, ३४ सेकंदांत पूर्ण केली. सुवर्णपदकासह ललिता पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक तसेच यावर्षी बीजिंगमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. याआधी इंदरजीत सिंगने सुवर्णपदकावर कब्जा केला होता.
२६ वर्षीय ललितासाठी हा हंगाम पदकदायी ठरला आहे. गेल्या वर्षी इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच प्रकारात ललिताने कांस्यपदकाची कमाई केली होती. पदकासह ललिताने सुधा सिंगचा ९ मिनिटे आणि ४७ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. ललिताने ९ मिनिटे आणि ३५ सेकंदात शर्यत पूर्ण केली होती.
जबरदस्त फॉर्मात असलेल्या विकास गौडाने थाळीफेक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. विकासने ६२.०३ अंतरावर थाळी फेकत अव्वल स्थान मिळवले. २०१३मध्ये पुणे येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ६४.९० मीटर अंतरासह विकास सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या मात्र अमेरिकेत प्रगत प्रशिक्षण घेत असलेल्या ३१ वर्षीय विकाससाठी २०१५ वर्ष फलदायी ठरले आहे. शांघाय येथे झालेल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत विकासने ६३. ९० मीटर अंतरावर थाळी फेकत कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर ट्रिटॉन निमंत्रितांच्या स्पर्धेत विकासने अव्वल स्थान मिळवले होते. सॅन डिएगो येथे झालेल्या स्पर्धेत विकासने ६५.७५ मीटर अंतरावर थाळी फेकण्याचा विक्रम केला होता. या दिमाखदार कामगिरीसह विकास पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला होता.