श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल, प्रशिक्षक चंडीका हथरुसिंघे आणि संघ व्यवस्थापक अशनका गुरुसिन्हा यांच्यावर आयसीसीने ४ वन-डे व २ कसोटी सामन्यांची बंदी घातली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत बॉल टॅम्परिंग आणि खेळभावना न दाखवून वाद घातल्यामुळे आयसीसीने ही कारवाई केल्याचं समजतं आहे. या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये चंडीमल खेळू शकणार नाहीये.

आयसीसीने नेमून दिलेल्या चौकशी अधिकाऱ्याने तिन्ही जणांना शिक्षा सुनावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सेंट लुशिया येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यादरम्यान, श्रीलंकन कर्णधार चंडीमलवर बॉलचा आकार बदलवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंनी कोणतीही चुकीची गोष्ट केली नसल्याचं म्हटलं होतं.

या प्रकारानंतर लंकेच्या खेळाडूंनी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामना सुरु होण्यासाठी दोन तास उशीर लागला. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या मध्यस्थीनंतर सामना सुरु झाल्यानंतर पंचांनी वेस्ट इंडिजच्या संघाला ५ धावा बहाल केल्या होत्या. श्रीनाथ यांच्यासमोर झालेल्या सुनावणीतही चंडीमल याच्यावर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.