श्रीलंकेची टी-२० लीग म्हणजेच लंका प्रीमियर लीगचा (एलपीएल) दुसरा हंगाम ३० जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान रंगणार आहे. श्रीलंका क्रिकेटने या स्पर्धेची घोषणा केली. मागील हंगामात या स्पर्धेत काही भारतीय खेळाडू देखील खेळले होते.

 

श्रीलंका क्रिकेट मॅनेजमेंट कमिटीचे प्रमुख अर्जुन डी सिल्वा म्हणाले, ”यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी आम्हाला योग्य विंडो मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सध्या या स्पर्धेचे अन्य तपशील निश्चित करण्याचे काम करीत आहोत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड स्पर्धेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी देशातील आरोग्याची स्थिती निश्चित करण्यासाठी स्पर्धा होण्यापूर्वी देशाच्या स्थितीचे मूल्यांकन करेल आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करेल.”

 

एलपीएलचा पहिला हंगाम मागील वर्षी हंबनटोटा येथे खेळला गेला होता, त्यात पाच संघ सहभागी झाले होते. बायो बबल वातावरणात सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळले गेले. जाफना स्टॅलियन्सने अंतिम सामन्यात गॉल ग्लेडिएटर्सला पराभूत करून पहिले विजेतेपद जिंकले.

गेल्या वर्षी खेळले होते भारतीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि अन्य देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या काही भारतीय खेळाडूंनी गेल्या वर्षी लंका प्रीमियर लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रीत गोनी, सुदीप त्यागी हे भारतीय खेळाडू गेल्या वर्षी या स्पर्धेत खेळताना दिसले. लंका प्रीमियर लीगमध्येही पाकिस्तानचे खेळाडूही खेळताना दिसले.