ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर या दोघांमध्ये सर्वोत्कृष्ट कोण, या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेमध्ये आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने भाग घेतलाय. सचिनपेक्षा लाराच वरचढ ठरतो, असे मत या अष्टपैलू क्रिकेटपटूने व्यक्त केलंय.
लाराच सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. माझ्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत मी त्याला पाहतोय. सध्याच्या काळातील सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग या दोन श्रेष्ठ खेळाडूंपेक्षा लारा निश्चितच वरचढ आहे, असे आफ्रिदीने एका मुलाखतीत म्हटले आहे.
लारा खेळपट्टीवर असताना गोलंदाजी करणे खरंच अवघड असते. मी स्वतः त्याच्याविरुद्ध सर्व प्रकारांमध्ये खेळलो आहे. तो कोणत्याही चेंडूवर चौकार लगावू शकतो. विशेषतः फिरकी गोलंदाजांचे चेंडू तो सहजपणे सीमेपार ठोकू शकतो. लाराची फलंदाजी बघताना खरंच खूप मजा येते, या शब्दांत आफ्रिदीने लाराचे कौतुक केलंय. एकेकाळी तर मला लारा डोळे झाकूनही फिरकीपटूंच्या गोलंदाजीचा सहजपणे सामना करू शकेल, असे वाटायचे, असे सांगून सचिन आणि पॉंटिंगची फलंदाजीही सुरेख आहे. मात्र, लारा या दोघांपेक्षा वरचढ आहे हे नक्की, असे आफ्रिदीने म्हटले आहे.