श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटला निरोप दिला आहे. मलिंगाने मंगळवारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. मलिंगाने ट्वीट करून म्हटले, ”मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करेन.”

मलिंगा आता लवकरच कोचिंगच्या भूमिकेत येणार आहे. मलिंगा गेल्या वर्षापासून टी-२० क्रिकेटपासून दूर आहे. त्याने आयपीएल २०२० मधून आपले नावही मागे घेतले होते. मलिंगा टी-२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची टी-२० कारकीर्द अतुलनीय होती. मलिंगा जगभरातील २९ संघांचा भाग होता. आयपीएलमध्ये ते मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचे खेळाडू होता. या महान गोलंदाजाने २९५ टी-२० सामन्यांमध्ये ३९० विकेट्स घेतल्या. मलिंगाचा इकॉनॉमी रेट फक्त ७.०७ होता.

 

 

हेही वाचा – IPL मधील दोन नव्या संघांबाबतची महत्त्वाची माहिती आली समोर; ‘या’ तारखेला होणार लिलाव

लसिथ मलिंगाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले. मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा हॅट्ट्रिक घेतली, तर सलग ४ विकेट घेण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट घेणारा मलिंगा पहिला गोलंदाज आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. गोलंदाजीशिवाय मलिंगाने फलंदाजीत २०१०मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मलिंगाने अँजेलो मॅथ्यूजसोबत ९व्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली, जो अजूनही एक विश्वविक्रम आहे.